Belagavi

काँग्रेसविरोधात बेळगावात भाजपचे आंदोलन

Share

नीट परीक्षा गैरव्यवहाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली पंतप्रधान मोदींचा अवमान, देशविरोधी घोषणा आणि भाजप आमदारावर अंडी फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनांचा निषेध करत बेळगावात भाजपने आंदोलन केले.

राणी चन्नम्मा चौकातून काँग्रेस भवनाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना रोखताना पोलिसांची मोठी कसरत झाली. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आंदोलनाच्या नावाखाली देशाच्या पंतप्रधानांचा अवमान करणे आणि भाजप आमदारावर अंडी फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनांचा आज बेळगावात भाजपने तीव्र निषेध केला.

या वेळी बोलताना भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके म्हणाले की, दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात काँग्रेस आपली पोळी भाजून घेत आहे. तसेच देशविरोधी घटकांचे फोटो वापरून आंदोलन केले जात आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःवरील अन्यायासाठी आंदोलन करावे, त्याला आमचा विरोध नाही. परंतु देशविरोधी कृत्ये केली जात आहेत. बेळगावातही काल झालेल्या आंदोलनात पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द वापरण्यात आले. बेळगावात पंतप्रधान मोदींविरोधात आणि स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्यास खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले की, बंगळुरूत आंदोलन करणाऱ्या भाजप आमदारांवर अंडी फेकून हल्ला करण्याचे काम केले आहे. भाजप याचा तीव्र निषेध करतो. आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्द वापरून अवमान केला गेला. दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहेत, त्याकडे सरकार लक्ष देत नाही, असा आरोप त्यांनी केला.

 

माजी आमदार महांतेश कवटगीमठ आणि भाजप नेत्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी विधाने व घोषणा देणाऱ्यांची व्हिडीओ क्लिपद्वारे ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

यापूर्वी भाजप कार्यकर्ते काँग्रेस भवनाला घेराव घालण्यासाठी निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवले. यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. बॅरिकेड्स बाजूला सारून काँग्रेस भवनाकडे मोर्चा नेणाऱ्यांना रोखण्यात पोलिसांना अखेर यश आले.

या वेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: