Belagavi

नीट गैरव्यवहाराच्या निषेधार्थ बेळगावात तीव्र निदर्शने; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Share

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा प्रश्नपत्रिका गळती आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांचा निषेध करत युथ काँग्रेस आणि विद्यार्थ्यांनी बेळगावात तीव्र निदर्शने केली. यावेळी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात युथ काँग्रेसचे नेते अमान सेठ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी आणि पालक एकत्र आले होते. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला न्याय आणि योग्य भरपाई मिळावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

गेल्या १० वर्षांत तब्बल १५० हून अधिक तर अलीकडच्या काळात ७० हून अधिक वेळा विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप आंदोलकांनी केला. लाखो तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुसळधार पावसातही पालक आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनात भाग घेतला. गरीब, शेतकरी आणि कष्टकरी वर्ग आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी रक्ताचे पाणी करतो; मात्र व्यवस्थेतील त्रुटींमुळे मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली. तसेच शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून होणाऱ्या लाठीचार्जाचाही त्यांनी तीव्र निषेध केला.

युथ काँग्रेस नेते अमान सेठ यांनी सांगितले की, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये केवळ २२ कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी असून उर्वरित सर्व कंत्राटी कर्मचारी आहेत, ही चिंतेची बाब आहे. हे आंदोलन राजकीय नसून तरुणांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: