Belagavi

वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास शक्य; प्रा. मायाप्पा पाटील यांचे प्रतिपादन

Share

सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचन अत्यंत आवश्यक असून उत्तम पुस्तकांची सोबत यशस्वी जीवनाचा मार्ग सुकर करते, असे प्रतिपादन प्रा. मायाप्पा पाटील यांनी केले.

बेळगाव येथील महिला विद्यालयात जायंट्स सखी संघटनेच्या वतीने ‘वाचाल तर वाचाल’ या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात प्रा. मायाप्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्याने पुस्तकांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

महात्मा गांधी, डॉ. बी. आर. आंबेडकर, सावित्रीबाई फुले, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, सुधा मूर्ती आणि मार्क झुकरबर्ग यांच्या जीवनचरित्रांचे दाखले देत त्यांनी वाचनाचे महत्त्व पटवून दिले. प्रत्येकाने दैनंदिन जीवनात वाचनाची सवय अंगीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंट्स सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिणोळकर होत्या. व्यासपीठावर विभागीय संचालक संजय पाटील, फेडरेशन संचालक सुनील मुतगेकर, अर्पणा पाटील आणि महिला विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णाजी पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रमाला जायंट्स सखीच्या माजी अध्यक्षा शीतल पाटील, उपाध्यक्षा राजश्री हसबनी, स्वाती फडके, अर्चना कंग्राळकर, वैशाली भातकांडे, वरदा अंगडी, सुवर्णा काळे, सुलोचना कुट्रे, शीतल नेसरीकर, नीलिमा करंजीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपा पाटील यांनी केले.

Tags: