Belagavi

बेळगावात रोटरी क्लब उत्तरतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव अभियान

Share

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

शहरातील १० प्रमुख केंद्रांवर शाडूच्या मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या असून, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळून पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या अभियानाची माहिती दिली. या उपक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला असून, सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवात केवळ शाडूच्याच मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात असून, यंदाही नागरिकांनी पीओपी आणि रासायनिक रंगांच्या मूर्ती टाळून शाडूच्या मूर्तींनाच प्राधान्य द्यावे, अशी माहिती रोटरी क्लबचे अधिकारी सुधीर यांनी दिली.

पीओपीच्या मूर्तींमुळे जलस्रोत दूषित होतात आणि विसर्जन प्रक्रियेत मूर्तींची विटंबना होते, हे टाळण्यासाठीच हे हरित अभियान सुरू ठेवण्यात आल्याचे माजी अध्यक्ष इरफान शेख यांनी सांगितले.

प्रदूषण रोखण्यासाठी रोटरी क्लबतर्फे बामणे टॉवर्स (गोवा वेस), कुमारस्वामी लेआउट, भाग्यनगर, किर्लोस्कर रोड, वडगाव, खासबाग सर्कल, शिवबसवनगर, टिळकवाडी, हिंडलगा आणि मदनोली रोड या १० केंद्रांवर बुकिंग व वितरण व्यवस्था करण्यात आली आहे.

Tags: