Belagavi

सराफ व्यायवसायिकच निघाला चोरीचा बनाव रचणारा सूत्रधार!

Share

बेळगाव शहरात एका सराफ व्यावसायिकाने स्वतःच्याच दुकानात चोरीचे नाटक रचल्याचा प्रकार समोर आला असून, खडेबाजार पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत संशयित मालकाला अटक केली आहे. शहर पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची अधिकृत माहिती दिली.

बेळगावमधील रामदेव गल्ली येथील ‘व्ही. पी. वेर्णेकर अँड सन्स’ या सोन्या-चांदीच्या दुकानात चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास केला असता, खुद्द तक्रारदार मालकानेच हा कट रचल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

टिळकवाडी येथील सावरकर रोडचे रहिवासी कृष्णानंद विश्वनाथ वेर्णेकर यांनी १७ जुलै रोजी खडेबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. १६ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला असता, तक्रारदारावरच संशय बळावला. यानंतर पोलिसांनी कृष्णानंद वेर्णेकर यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी स्वतःच दुकानातील दागिने आणि रोकड काढून आपल्या स्कूटरच्या डिकीमध्ये लपवून ठेवल्याची कबुली दिली, असे भूषण बोरसे यांनी सांगितले.

Tags: