सोनम वांगचुक यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आणि ‘नीट’ परीक्षा घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी बेळगावमध्ये पुरोगामी संघटनांच्या वतीने भव्य पादयात्रा काढण्यात आली. डॉ. आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलकांनी घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली.


वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ मधील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका फुटीची प्रकरणे अत्यंत चिंताजनक असून सरकार यात अपयशी ठरल्याचा आरोप राजू टोपणावर यांनी केला. गेल्या काही वर्षांतील अशा प्रकरणांमुळे देशातील तरुणांच्या भविष्यावर गदा येत असून, नागरिकांनी या व्यवस्थेविरोधात संघटित होऊन लोकशाही मार्गाने लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसरे आंदोलक शिवाजीराव कागणीकर यांनी, एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षांमध्ये त्रुटी समोर आल्यानंतरही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून अद्याप राजीनामा न दिल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला. गेल्या २० दिवसांपासून विद्यार्थी रस्त्यावर उतरून न्याय मागत आहेत. कष्ट करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याने त्यांच्यात नैराश्याची भावना निर्माण होत असून, सरकारने यावर तातडीने ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
तसेच, गेल्या २० दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर चर्चा न करता त्यांना अटक करणे लोकशाहीत अयोग्य असल्याचे आंदोलकांनी सांगितले. शिक्षण व्यवस्थेचे खासगीकरण करण्याचे प्रयत्न थांबवावेत, अन्यथा गरीब, दलित आणि महिला शिक्षणापासून वंचित राहतील, अशी भीती व्यक्त करत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments