नवीन मतदारांची नोंदणी, मृत तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणि दुरुस्तीसह मतदार यादी पुनरीक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी बीएलओंनी घरोघरी जाऊन पडताळणी करावी, असे निर्देश कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी वाय. अन्बुकुमार यांनी दिले.


बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या मतदार यादी विशेष पुनरीक्षण आढावा बैठकीत ते बोलत होते. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादीची पारदर्शकता व अचूकता जपण्यासाठी पुनरीक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगत बीएलओंच्या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या. पुनरीक्षणाची सर्व माहिती मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना वेळेवर देण्यात यावी, प्राप्त होणाऱ्या तक्रारी व हरकतींची रीतसर नोंद घेऊन आयोगाच्या नियमानुसार त्वरित निवारण करावे आणि आठवड्यातून एकदा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय प्रत्येक तालुक्यात १०० टक्के उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


या वेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्व अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करून जबाबदारीने काम करावे, असे सांगत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. या बैठकीला प्रोबेशनरी आयएएस अधिकारी रोहित सिंग, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होणकेरी यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीनंतर मुख्य निवडणूक अधिकारी वाय. अन्बुकुमार आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी वडगाव भागातील खासबाग नंबर ३ सरकारी शाळेला भेट देऊन बीएलओंकडून मतदार यादी पुनरीक्षणाच्या प्रत्यक्ष कामाची पाहणी केली व त्यांच्याशी चर्चा केली.


Recent Comments