बेळगाव शहरात कॅम्प परिसरातील जिमखाना रमी क्लबमध्ये घडलेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तपासाला गती दिली असून, हल्लेखोरांना घटनास्थळी आणणाऱ्या कार चालकाला अटक केली आहे.

बेळगावमधील एका रमी क्लबमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सुरेश जालकार नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात हल्लेखोरांना वाहनाची मदत पुरवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. अटकेनंतर कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून बेळगावच्या बिम्स रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयिताला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

जिमखाना क्लबमधील या घटनेदरम्यान संशयित हल्लेखोरांनी सुरेश जालकार याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वेळीच सतर्कता दाखवल्याने सुरेश या हल्ल्यातून सुखरूप बचावला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, प्रफुल पाटील आणि सुरेश जालकार यांच्यातील जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. प्रफुल पाटील याच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाला असल्याचा संशय असून, या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. कॅम्प पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


Recent Comments