Belagavi

येळ्ळूर रस्ता बायपास जवळ चिखलामुळे भीषण अपघात

Share

येळ्ळूर रस्ता बायपास जवळ रस्त्यावर पसरलेल्या चिखलामुळे दुचाकी वाहने घसरून अनेकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

हलगा-मच्छे बायपासचे काम वेगाने सुरू असून या कामाची वाहने येळ्ळूर रस्ता आणि गावातून जात असल्याने रस्त्यावर मातीचा मोठा थर साचला आहे. यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीने संबंधित ठेकेदाराला तंबी देऊन वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी ठेकेदाराने तात्पुरती खबरदारी घेतली होती, परंतु रविवारी पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला.

वडगावहून येळ्ळूर मार्गे जाणारी दुचाकी वाहने संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत बायपास जवळ घसरून पडली. सुमारे २५ ते ४० वाहने निसरडीमुळे पडून अनेकजण जखमी झाले, तर वाहनावरील महिला आणि लहान मुले चिखलात पडल्याने पूर्णपणे माखली. मुलांची अवस्था पाहून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी धाव घेऊन त्यांना सावरले आणि पुढे पाठवले. एका व्यक्तीने आणलेला घरचा बाजारही रस्त्यावर पडून अस्ताव्यस्त झाला.

या परिस्थितीमुळे संतप्त झालेले शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झाले. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी उद्या सोमवारी तिथेच तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags: