बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे आयोजित सर्वसाधारण सभेत संघाचे अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध अनुदान योजना आणि लाभांशाची घोषणा केली. संघाचा लाभांश थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.


दूध पुरवठा करणाऱ्या सक्रिय सदस्यांना ६० हजार रुपये आणि सध्या दूध न पुरवणाऱ्या सदस्यांनी पुढील ६ महिन्यांत दूध पुरवठा सुरू केल्यास त्यांना ७५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल, अशी माहिती भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली. तसेच रबर मॅट, चाफ कटर आणि मिल्किंग मशिन खरेदीवर ६० टक्के सबसिडी देण्याची घोषणा त्यांनी केली.


संघाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जुन्या डेअरी इमारतींच्या नूतनीकरणाकरिता २ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. याशिवाय लवकरच अत्याधुनिक हायटेक मेगा डेअरी स्थापन करण्यात येणार आहे. सध्या बेळगाव संघात दररोज विक्रमी २.७५ लाख लिटर दूध संकलन होत असून ते ३ लाख लिटरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


या वेळी संघाचे सर्व संचालक आणि अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments