Belagavi

बेळगावमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षकांचे आंदोलन

Share

जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी या मुख्य मागणीसह शिक्षकांच्या इतर प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा कर्मचारी संघाच्या बेळगाव आणि चिकोडी जिल्हा घटकातर्फे शनिवारी बेळगावमध्ये आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक सदाशिव ईरेश सांभाळ यांनी शिक्षकांच्या व्यथा मांडल्या. निवृत्तीनंतर पेन्शन नसल्याने शिक्षकांना उतारवयात आर्थिक टंचाई सोसावी लागत आहे. शासनाने या मागण्या गांभीर्याने घेऊन मुख्यमंत्र्यांनी यात वैयक्तिक लक्ष घालावे आणि या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी सांभाळ यांनी केली.

हुक्केरी माध्यमिक शाळा कर्मचारी संघाचे सदस्य रमेश बडीगेर यांनी शिक्षकांच्या असुरक्षित भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली. संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी देणाऱ्या शिक्षकाला निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा न मिळणे क्लेशदायक असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत पेन्शन योजना लागू होत नाही, तोपर्यंत बसवराज होरट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा सुरूच राहील, असा निर्धार बडीगेर यांनी व्यक्त केला.

इतर आंदोलकांनीही पेन्शन योजनेच्या आवश्यकतेवर भर दिला. निवृत्तीनंतर सन्मानाने जगण्यासाठी पेन्शन अत्यंत गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने याची तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. या आंदोलनात माध्यमिक शाळा कर्मचारी संघाचे पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: