बेळगाव शहरातील रामदेव गल्ली येथील व्ही. पी. वेर्णेकर अँड सन्स या सराफा दुकानात झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणाला आता एक वेगळेच वळण मिळाले आहे. याप्रकरणी चोरीची तक्रार दाखल करणाऱ्या दुकान मालकानेच हा सर्व बनाव रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

टिळकवाडी येथील सावरकर रोडवर राहणारे सराफा व्यावसायिक कृष्णानंद विश्वनाथ वेर्णेकर यांनी १७ जुलै रोजी खडेबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. १६ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने आणि रोकड चोरल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण आणि पुराव्यांच्या आधारे तपास केला असता, खुद्द तक्रारदारावरच पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी कृष्णानंद वेर्णेकर यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी स्वतःच दुकानातील सोने, चांदी आणि रोकड चोरून ती आपल्या ॲक्टिव्हा स्कूटरच्या डिक्कीतून सुरक्षित स्थळी हलवल्याची कबुली दिली.

पोलिसांनी या कारवाईत आरोपीकडून एकूण ६५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ६२ लाख ६० हजार ९९० रुपये किमतीचे ५१९.८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६ हजार रुपये किमतीचे ३१ ग्रॅम चांदीचे दागिने, २ लाख ८३ हजार ११० रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली ४५ हजार रुपयांची ॲक्टिव्हा स्कूटर समाविष्ट आहे.
तक्रारदार व्यक्तीच या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे. तसेच, या गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या खडेबाजार पोलीस पथकाचे त्यांनी कौतुक केले आहे.


Recent Comments