खानापूर-जांबोटी रस्त्यावरील शनया गार्डनजवळ रस्त्यातील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ऑटो रिक्षा नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात सहा महिलांसह सात प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच त्या मार्गावरून जाणारे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पंडित ओगले आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ आपल्या वाहनांमधून जखमींना रुग्णालयात दाखल केले. खानापूर शहरातील नाईक गल्ली येथील रहिवासी नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आंबोळी गावाकडे रिक्षामधून जात होते. दरम्यान, रस्त्यावरील खड्डे आणि पसरलेल्या खडीमुळे चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या घटनेत यल्लव्वा नाईक, केंशव्वा नाईक, बसव्वा नाईक, महादेवी देसूरकर, दुर्गव्वा देसूरकर, शांता देसूरकर आणि रुद्रप्पा नाईक हे जखमी झाले आहेत.

त्याचवेळी जांबोटीकडे चाललेले भाजप युवा नेते पंडित ओगले आणि अनंत सावंत यांनी मानवता दाखवत आपल्या बोलेरो आणि वॅगनआर गाड्यांमधून जखमींना तातडीने खानापूर रुग्णालयात दाखल केले. यांपैकी गंभीर दुखापत झालेल्या बसव्वा, केंशव्वा आणि दुर्गव्वा यांना पुढील उपचारासाठी बेळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या बचावकार्यात सनी मायेकर, बंटी बुवाजी, ज्योतिबा चौगुले आणि निलेश कुंभार यांनी सहकार्य केले. दरम्यान, खानापूर-जांबोटी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.


Recent Comments