Vijayapura

मतदार यादीत नाव नोंदवून हक्क जपा:डॉ. अंजली निंबाळकर

Share

राज्यात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत नागरिकांनी आपले नाव निश्चित करावे आणि ज्यांचे नाव नाही त्यांनी नमुना-६ भरून नाव नोंदवावे, असे आवाहन कित्तूर कर्नाटक काँग्रेसच्या प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले आहे. विजापूर येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या की, मतदार यादी पुनरीक्षण हा कोणत्याही राजकीय पक्षापुरता मर्यादित कार्यक्रम नसून तो प्रत्येक नागरिकाच्या मतदानाचा हक्क सुरक्षित करणारी प्रक्रिया आहे. मतदार यादीत नाव असणाऱ्यांनाच सरकारच्या विविध गॅरंटी योजनांचा लाभ मिळतो, त्यामुळे नाव नोंदणी अत्यंत आवश्यक आहे.

काही ठिकाणी काँग्रेस समर्थकांची नावे मतदार यादीतून वगळण्याच्या उद्देशाने भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन अर्ज गोळा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रक्रियेत नागरिकांना मदत करण्यासाठी काँग्रेसतर्फे तालुका पातळीवर प्रशिक्षण देण्यात आले असून हेल्पलाइनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. राज्य सरकारने पाच गॅरंटी योजना यशस्वीपणे राबवून लोकांचा विश्वास जिंकला असून, याच विश्वासाच्या जोरावर २०२८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपले नाव नोंदवून घ्यावे, जेणेकरून मतदानाचा हक्क आणि शासकीय योजनांचे लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे आवाहन कित्तूर कर्नाटक काँग्रेस प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले.

या पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन लोणी, नेते अब्दुल हमीद मुश्रीफ, वसंत होनमोडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: