Belagavi

बेळगावातील क्लबवर पोलिसांची करडी नजर

Share

बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील क्लबमधील बेकायदेशीर उपक्रमांना चाप लावण्यासाठी पोलीस विभागाने संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.

नियम मोडणाऱ्या क्लबवर कडक कायदेशीर कारवाई करत त्यांचा परवाना थेट रद्द केला जाईल, असा संयुक्त इशारा पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) के. रामराजन यांनी दिला आहे. शहरातील काही अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने क्लब आणि जिमखान्यांच्या कामकाजावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, आयुक्त भूषण बोरसे यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांना शहरातील क्लबची सखोल तपासणी करून १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
हायकोर्टाच्या निर्देशानुसार क्लबमध्ये सीसीटीव्ही बसवणे, १५ दिवसांचे फुटेज जतन करणे, केवळ सदस्यांनाच प्रवेश देणे आणि पैशांवर खेळल्या जाणाऱ्या जुगारावर पूर्ण बंदी घालणे अशा कडक अटी प्रशासनाकडून लेखी स्वरूपात दिल्या जात आहेत. कायदेशीर चालणाऱ्या केंद्रांना कोणताही त्रास दिला जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर जुगार क्लबला परवानगी दिली जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. टेनिस, बॅडमिंटन किंवा केवळ मनोरंजनासाठी असणाऱ्या अधिकृत सोशल क्लबना आमचा विरोध नाही, मात्र क्लबच्या नावाखाली टेबल मांडून सट्टा किंवा व्याजाचा काळाधंदा चालवल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सध्या जिल्ह्यात असा एकही बेकायदेशीर क्लब सुरू नसल्याची माहिती देत एसपींनी आवाहन केले की, नागरिकांनी अशा अवैध धंद्यांची माहिती दिल्यास ते स्वतः वैयक्तिकरित्या धाड टाकतील. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Tags: