Vijayapura

विजापूर जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Share

पावसाच्या तुटवड्यामुळे हातातले पीक गेल्याने आणि कर्जाचा डोंगर न पेलवल्यामुळे एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील तडवलगा गावात घडली आहे.

तडवलगा गावातील रहिवासी नागप्पा भीमाशा अथर्गा यांनी आपल्या शेतातील घरात गळफास लावून आत्महत्या केली. मृत शेतकऱ्याने कोटक महिंद्रा बँकेकडून सुमारे १५ लाख रुपये, स्थानिक सहकारी संस्थेकडून ६५ हजार रुपये आणि खाजगी स्वरूपात ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. पावसाअभावी उसाचे पीक पूर्णपणे जळून गेल्याने हे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय आहे. याप्रकरणी होर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला सरकारने योग्य आर्थिक मदत द्यावी, त्यांचे कर्ज माफ करावे आणि कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य करावे, अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांनी केली आहे.

Tags: