कर्नाटक राज्य संघटनेच्या वतीने बेंगळुरू येथील बसवनगुडी जलतरण तलावात आयोजित कनिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या ‘आबा आणि हिंद स्पोर्ट्स क्लब’चा जलतरणपटू तनुज सिंग याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

तनुज सिंग याने ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक स्पर्धा ३०.६४ सेकंदात आणि २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक स्पर्धा २ मिनिटे ३२.०९ सेकंदात पूर्ण करून दोन रौप्य पदके जिंकली. तसेच, १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात १ मिनिट ०९.४८ सेकंद अशी वेळ नोंदवत कांस्य पदक आपल्या नावावर केले.

या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर पुढील महिन्यात ओरिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कनिष्ठ गट जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात तनुजची निवड झाली आहे. त्याला एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांचे मार्गदर्शन, तर क्लबचे अध्यक्ष शीतल हुळभत्ते, अरविंद संगोळी, शुभांगी मंगळूरकर आणि नगरसेवक नितीन जाधव यांचे प्रोत्साहन लाभले आहे.


Recent Comments