बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मोदगा गावातील श्री मारुती मंदिराची सुमारे ९२ एकर ३९ गुंठे जमीन कर्नाटक गृहनिर्माण मंडळाकडून संपादित केली जाणार होती. या पार्श्वभूमीवर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी बंगळुरू येथील केएचबी मुख्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.


या बैठकीला विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि गावातील पंच कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी श्री मारुती मंदिराचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. मंदिराच्या जमिनीशी संबंधित सर्व अधिकृत कागदपत्रे सादर करत, नागरिकांच्या धार्मिक भावनांचा आदर करून ही जमीन संपादन प्रक्रियेतून त्वरित वगळण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
शिष्टमंडळाच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, केएचबी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून ही जमीन संपादन प्रक्रिया रद्द करण्याचे आश्वासन दिले.
या निर्णयानंतर बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, मतदारसंघातील जनतेच्या हिताचे रक्षण करणे ही आपली पहिली प्राथमिकता आहे. देवाच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. लोकप्रतिनिधी आणि या मातीची कन्या म्हणून नागरिकांच्या धार्मिक श्रद्धा आणि हक्कांच्या रक्षणासाठी आपण नेहमीच तत्पर राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या तात्काळ पुढाकारामुळे मंदिराची जमीन सुरक्षित झाल्याने मोदगा ग्रामस्थ, मंदिर प्रशासन आणि पंच कमिटीच्या सदस्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.


Recent Comments