बेळगाव शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपूल प्रकल्पाचे काम सप्टेंबरअखेर कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली.


सार्वजनिक बांधकाम विभागाने डिझाइन केलेल्या पहिल्या टप्प्यातील उड्डाणपुलाच्या कामासाठी २७० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली असून, ही मुदत ऑगस्टपर्यंत असेल. सप्टेंबर महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. याच वर्षी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दुसऱ्या टप्प्यातील २५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे डिझाइन पुढील तीन महिन्यांत अंतिम करून मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवले जाईल, असे मोहम्मद रोशन यांनी म्हटले.

उड्डाणपुलाच्या कामादरम्यान शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस आयुक्तांनी पर्यायी वाहतूक मार्गांचा आराखडा तयार केला आहे. प्राथमिक बांधकाम, तात्पुरती बॅरिकेडिंग आणि पर्यायी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एकूण निधीतील ३ कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच वीज वाहिन्या, पाणी आणि मलनिस्सारण वाहिन्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठीच्या खर्चाचा समावेश मूळ आराखड्यात करण्यात आला आहे.
प्रकल्पाच्या मार्गात यापूर्वी येणाऱ्या झाडांची कत्तल न करता, शासकीय जागांवर १ ते २ किलोमीटरच्या परिसरात त्यांचे आधुनिक तंत्रज्ञानाने पुनरोपण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. नागरिक आणि व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी लवकरच एक व्यापक सल्लागार बैठक घेतली जाईल, अशी माहिती मोहम्मद रोशन यांनी दिली.
या बैठकीत पोलीस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा वनसंरक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते उपस्थित होते.


Recent Comments