Belagavi

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; मोफत प्रशिक्षण शिबिर सुरू

Share

धनगर (कुरुबा) समाजातील युवक-युवतींना शासकीय सेवेत जास्तीत जास्त संधी मिळावी या उद्देशाने स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात येत असल्याची माहिती कनकश्री चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव पी. एन. कृष्णमूर्ती यांनी दिली.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्नाटक सरकारच्या ‘ग्रुप-सी’सह विविध स्पर्धा परीक्षांसाठी उमेदवारांना तयार करण्याच्या उद्देशाने विख्यात ‘इन्साईट्स आयएएस’ संस्थेचे संस्थापक संचालक विनय कुमार जी. बी. यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित केले आहे.

‘इन्साईट्स आयएएस’ ही संस्था स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणात आघाडीवर असून, त्यांच्या अनुभवी शिक्षकांनी आजवर हजारो उमेदवारांना आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि इतर उच्च पदांपर्यंत पोहोचवले आहे. याच अनुभवाचा फायदा समाजातील विद्यार्थ्यांना करून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कनकश्री संकुलात राहण्याची आणि अभ्यासाची सोय असणारे हे प्रशिक्षण तीन महिन्यांचे असून ते पूर्णपणे मोफत असेल. उमेदवारांना केवळ स्वतःच्या जेवणाच्या खर्चासाठी प्रतिमहिना ६ हजार रुपये द्यावे लागतील. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ९४८३४२५०४६ किंवा ९४४८०१३५५९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला विश्वस्त सी. बसवराज व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: