Belagavi

बेळगावात चातुर्मासानिमित्त जैन मुनींचे भव्य आगमन

Share

बेळगाव शहरात चातुर्मासानिमित्त जैन मुनींचे भव्य आगमन झाले. अपार भाविकांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीद्वारे मुनींचे अत्यंत श्रद्धा आणि भक्तीभावाने स्वागत करण्यात आले.

पवित्र चातुर्मासानिमित्त बेळगाव शहरात जैन मुनींचा मंगल प्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. परमपूज्य श्री गच्छाधिपती राजेंद्र सुरीश्वरजी मुनी महाराज यांच्या आज्ञेने आणि ४५१ दीक्षादानेश्वरी परमपूज्य श्री गुणरत्नसुरीश्वरजी मुनी महाराज यांच्या दिव्य आशीर्वादाने मुनी श्री पुण्यरत्नसुरीश्वरजी, श्री रश्मिरत्न सुरीश्वरजी, श्री अर्हमरत्न विजयजी आणि पावन मिश्रा मुनी श्री गौतमरत्न, श्री सुधर्मरत्न व श्री त्रिभुवनरत्न मुनी महाराज यांचे शहरात आगमन झाले. बेळगावच्या पांगुळ गल्ली येथील मारवाडी स्थापित श्री चंद्रप्रभ जैन श्वेतांबर ट्रस्टच्या वतीने या धार्मिक महोत्सवाचे भव्य स्वागत करण्यात आले.

शहरातील प्रमुख खडेबाजार येथील संयुक्त महाराष्ट्र चौकातून सुरू झालेल्या मुनींच्या मंगल प्रवेश मिरवणुकीमुळे संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. जैन धर्माचा जयघोष, भक्तीगीते आणि पारंपारिक नृत्यांसह निघालेली मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून प्रवास करत पांगुळ गल्ली येथे पोहोचून संपन्न झाली. चातुर्मासाच्या या पवित्र धार्मिक सोहळ्यात श्वेतांबर जैन समाजातील हजारो स्त्री-पुरुष भाविक अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते.

Tags: