विजापूर जिल्ह्यातील तिकोटी तालुक्यातील सोमदेवरहट्टी येथे बेंदूर अमावस्येला दुर्गादेवीचा यात्रोत्सव उत्साहात सुरू झाला. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत राज्य व परराज्यांतील अनेक प्रभावी राजकारण्यांनी हजेरी लावली आहे.

या यात्रेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींसह इतर राज्यांतील अनेक प्रभावी नेते देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. येथे येऊन दर्शन घेतल्यास राजकीय क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा पूर्ण होतात, अशी नेत्यांची मान्यता आहे. यंदा या यात्रेत गुलबर्गाचे माजी खासदार उमेश जाधव, तांडा विकास महामंडळाचे अध्यक्ष जयदेव नायक आणि गोव्याचे आमदार मायकेल लोबो यांच्यासह विविध पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

सुमारे अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या तांड्यातील मंदिराला यापूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी भेट दिली होती. तसेच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, सुशीलकुमार शिंदे, दिवंगत अंबरीश, गोपीनाथ मुंडे, संजय पाटील यांच्यासह अनेक आयपीएस, आयएएस अधिकारी व न्यायाधीशांनी येथे भेट दिली आहे. यात्रोत्सवात हजारो भाविकांनी दर्शन घेतले.

दुर्गादेवीच्या प्रसिद्धीमुळे राजकीय क्षेत्रातील व्यक्ती येथे मोठ्या संख्येने हजेरी लावतात. देवीच्या या ख्यातीमुळे भाविकांची गर्दी वर्षेंदिवस वाढत आहे.


Recent Comments