बेळगाव महानगरपालिकेच्या अधिकारांवर गदा आणण्यासाठी कन्नड संघटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. बेळगाव पालिकेला मिळणारे हक्काचे अनुदान रोखण्यात यावे, अशी मागणी करत ‘गडिनाडू कन्नडिगरा सेना’ या संघटनेने भाषिक द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे.

बेळगाव हा कर्नाटकचा भाग असून महाजन अहवाल हाच अंतिम आहे, असा अधिकृत निर्णय बेळगाव पालिकेने घ्यावा, तोपर्यंत पालिकेला एकही पैशाचा निधी देऊ नये, अशी भूमिका कन्नड चळवळकर्ते बळराम मासेनट्टी यांनी घेतली आहे. पालिकेचे लोकप्रतिनिधी कर्नाटक सरकारचा आदर करत नसून, तरीही काळ्यामार्गाने २५० कोटी रुपयांचे विशेष अनुदान मिळवू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला. याविरोधात आधीच प्रादेशिक आयुक्तांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.

पालिकेच्या विकासासाठी असलेला ५० लाख रुपयांचा निधी गुजरात आणि राजस्थान दौऱ्याच्या नावाखाली लुटून मजा करण्यात आल्याचा गंभीर आरोप मासेनट्टी यांनी केला. येथील लोकप्रतिनिधी हे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला धार्जिणे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटक सरकारने बेळगाव महानगरपालिकेला निधी दिल्यास, बळळारी आणि बेंगळुरू येथील मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या संघटनेने दिला आहे. याप्रसंगी संतोष मासेनट्टी, संतोष तळ्ळीमनी, एस. एस. मूकन्नवर, मञ्जुनाथ, शानूर मुच्चंडी, ज्योतिकुमार हुल्लेन्नवर, राहुल, आनंद बिलावर आदी उपस्थित होते.


Recent Comments