Belagavi

बेळगावात भिक्षुकाच्या वेशातील चोराने लांबवला दीड लाखाचा मोबाईल

Share

बेळगावात भिक्षुकाच्या वेशातील एका चोराने मोबाईल दुकानातून तब्बल दीड लाख रुपये किमतीचा महागडा मोबाईल चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. ग्राहकाचे सोंग घेत अत्यंत चलाखीने मोबाईल खिशात टाकून चोर पसार झाला असून, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बेळगाव शहरातील गोवावेस चौकाजवळ असलेल्या एअरटेल ऑफिस शेजारील एका मोबाईल शोरूममध्ये भिक्षुकाच्या वेशात एका व्यक्तीने प्रवेश केला. मोबाईल पाहण्याच्या बहाण्याने हा चोर काउंटरजवळ गेला. त्यानंतर दुकान कर्मचाऱ्यांची नजर चुकवून त्याने दीड लाख रुपये किमतीचा महागडा फोन अत्यंत चाणाक्षपणे आपल्या खिशात टाकला. यानंतर बिलिंग काउंटरकडे जाण्याचा बहाणा करत, कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने त्याने दुकानातून पळ काढला.

काही वेळानंतर काउंटरवरील मोबाईल गायब असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ शोरूममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरीचा हा प्रकार समोर आला. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी बेळगावच्या टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पावले उचलली आहेत.

Tags: