Belagavi

बेळगावात मायलेकाची आत्महत्या

Share

बेळगावात एका २८ वर्षीय महिलेने आपल्या पोटच्या मुलासह जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर बेळगावच्या जिल्हा रुग्णालयाच्या (बिम्स) शवगृहाबाहेर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, सासरच्या जाचाला कंटाळूनच मायलेकांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमा तळवार (२८) आणि तिच्या मुलाने मानसिक तणाव तसेच कौटुंबिक छळाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग निवडला. या घटनेचे वृत्त समजताच मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी बिम्स रुग्णालयाकडे धाव घेतली. यावेळी संतप्त नातेवाईकांनी मृत प्रेमाची सासू सुशीला तळवार यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ कमालीचा तणाव निर्माण झाला होता.

मृताची आई फकीरव्वा पावडी यांनी सासरच्या मंडळींच्या छळाचा पाढा वाचताना सांगितले की, सासरच्या लोकांनी मृत प्रेमाच्या नावावर विविध बँका आणि वित्तीय संस्थांमधून सुमारे ६ ते ७ प्रकारची कर्जे काढली होती. तसेच आणखी १० लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. तिचे दागिने हिरावून घेणे आणि तिला उपाशी ठेवण्यासारखे अमानुष प्रकार सुरू होते, अशी प्रतिक्रिया फकीरव्वा पावडी यांनी दिली.

मृताचा भाऊ नागेश याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी घरात कोणीही नसताना ही दुर्दैवी घटना घडली. जुन्या कर्जाच्या ओझ्यासोबतच तम्मण्णी नावाचा एक व्यक्ती पैशांसाठी वारंवार घरी येऊन धमकावत होता. या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळूनच त्यांनी आपले जीवन संपवल्याचे नागेश यांनी म्हटले. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: