Belagavi

‘अपेक्स’ आर्थिक फसवणुकी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Share

येथील ‘अपेक्स’ कंपनीने ३,५०० गुंतवणूकदारांना तब्बल १६५ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकरी आणि माजी सैनिकांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून न्यायाची मागणी केली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून अनेक नागरिकांनी या कंपनीत लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, आता कंपनीचे चालक पैसे परत करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती गुंतवणूकदार गंगाप्पा अक्की यांनी प्रसारमाध्यमांना दिली. संकेश्वर येथील काशिनाथ वाघमोरे आणि उगार येथील गणेश भंडारी या कंपनीच्या मुख्य चालकांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केला असून, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे.

कंपनीच्या संचालकांनी गेल्या दोन महिन्यांपासून गुंतवणूकदारांना व्याज देणे बंद केले आहे. “येत्या तीन महिन्यांत तुमचे पैसे परत करू” असा केवळ व्हिडिओ संदेश पाठवून ते वेळ मारून नेत आहेत; मात्र प्रत्यक्ष समोर येण्यास तयार नाहीत, असा संताप गुंतवणूकदार अरविंद यांनी व्यक्त केला. शेतकरी आणि माजी सैनिकांच्या कष्टाचा पैसा सुरक्षित मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत मोठ्या संख्येने गुंतवणूकदार या वेळी उपस्थित होते.

Tags: