Belagavi

बेळगावात उच्चस्तरीय संत संमेलन; राम मंदिर तिजोरीr चोरी प्रकरणावर मिलिंद परांडे संतप्त

Share

अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक नियुक्त करून आठ जणांना अटक केली असली, तरी यामागील मुख्य सूत्रधारांना तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी केली आहे.

बेळगाव शहरातील लक्ष्मी टेकडी येथील प्रतिष्ठित हुक्केरी हिरेमठ संस्थानच्या वतीने ‘अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थे’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष परमपूज्य श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय संत सभेचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक परिषदेत प्रामुख्याने राम मंदिराची सुरक्षा, हिंदू लोकसंख्येची घसरण आणि सनातन धर्मासमोरील आव्हाने यावर सखोल मंथन करण्यात आले.

धर्माचार्यांना संबोधित करताना मिलिंद परांडे यांनी देशाच्या सुरक्षेविषयी महत्त्वाचा इशारा दिला. “सध्या भारतामध्ये हिंदूंची लोकसंख्या चिंताजनक पातळीवर घटत आहे. भविष्यात भारतीय सैन्यात हजारो पदे रिक्त होणार आहेत; जर प्रत्येक घरात एकच मूल असेल, तर देशाच्या सीमांचे रक्षण कोण करणार? म्हणूनच राष्ट्रीय सुरक्षेसाठी प्रत्येक हिंदू कुटुंबात किमान तीन मुले असणे काळाची गरज बनली आहे,” असे परांडे यांनी प्रतिपादन केले. तसेच, आगामी काळात होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये कोणत्याही पोटजातीचा उल्लेख न करता संघटित शक्ती म्हणून केवळ ‘हिंदू’ अशीच नोंद करण्यासाठी संतांनी ग्रामीण भागात जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

पीठाधीश श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले की, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कोणत्याही राजकीय चौकटीत अडकलेले नसून, ते केवळ राष्ट्रनिर्मितीचे कार्य करत आहेत. अयोध्येच्या पवित्र भूमीला लागलेला हा डाग पुसून काढण्यासाठी आणि मंदिराच्या नावावर अपप्रचार करणाऱ्या देशविरोधी शक्तींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी संपूर्ण संत समाज विहिंपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांनीही ग्रामीण भागातील हिंदू संघटनांवर भर देण्याचे आवाहन केले.

या संत संमेलनाला नूल सुरगीश्वर मठाचे गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी, कोल्लूर मरडी मठाचे डॉ. पवाडेश्वर शिवाचार्य स्वामीजी, बाघोजीकोप्प हिरेमठचे डॉ. शिवलिंग मुरुगराजेंद्र स्वामीजी, सत्तीगेरी हिरेमठचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी आणि बेळगावचे उपमहापौर हनुमंत कोंगाली यांच्यासह अनेक महनीय संत व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: