Vijayapura

फेसबुक प्रोफाईल लॉकवरून आम. यत्नाळांचे विजयेंद्र समर्थकांना खुले आव्हान

Share

विजापूर येथील भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ आणि प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. विजयेंद्र नोव्हेंबरपर्यंत आपल्या पदावरून पायउतार होतील, असा दावा करत यत्नाळ यांनी फेसबुक प्रोफाईलच्या मुद्द्यावरून विजयेंद्र आणि त्यांच्या समर्थकांना खुले आव्हान दिले आहे.

विजापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार यत्नाळ यांनी प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्यावर जोरदार निशाणा साधला. विजयेंद्र यांचे समर्थन करणाऱ्यांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलचे लॉक काढून जाहीरपणे समोर यावे, असे आव्हान त्यांनी दिले.

आपले कार्यकर्ते चामराजनगरपासून बीदरपर्यंत प्रत्येक गोष्टीला चोख उत्तर देतील, असे यत्नाळ यांनी सांगितले. केवळ याच भीतीने विजयेंद्र यांच्या समर्थकांनी आपले फेसबुक प्रोफाईल लॉक करून ठेवल्याचा टोला त्यांनी लगावला. विजयेंद्र यांच्या कार्यकर्त्यांचे फेसबुक प्रोफाईल उघडल्यास त्यावर केवळ ‘लॉक’ असेच दिसते, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. याचवेळी आगामी नोव्हेंबर महिन्यापर्यंत विजयेंद्र प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होतील, असे भाकीतही यत्नाळ यांनी वर्तवले.

Tags: