राज्यातील भाजपमध्ये ‘नोव्हेंबर क्रांती’ अटळ असून, तसे न झाल्यास कर्नाटकात भाजपचे अस्तित्व संपेल, अशी टीका आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केली आहे. विजापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विधान परिषद निवडणुकीतील व्हीपवरून बोलताना आमदार यत्नाळ यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. मतदान झाल्यानंतर मागील तारखेचा व्हीप बजावण्यात आला असून, डी. के. शिवकुमार यांच्या दबावाखाली हे घडल्याचा आरोप त्यांनी केला. खोट्या स्वाक्षऱ्यांचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगितल्यामुळेच हा प्रकार घडला असून, शिवकुमार यांच्यासमोर हात बांधून स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या, असे बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी म्हटले.

अलीकडेच रट्टीहळ्ळी येथे झालेल्या विजयेंद्र यांच्या कार्यक्रमाला अत्यंत कमी उपस्थिती होती आणि आलेले लोक केवळ तिकिटाच्या अपेक्षेने आले होते, असे त्यांनी नमूद केले. याउलट आपल्या दौऱ्यात हजारो लोक सहभागी झाल्याचा दावा त्यांनी केला. बी. सी. पाटील यांच्या मतदारसंघात एका हिंदू तरुणाची हत्या होऊनही त्यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली नाही, अशा पद्धतीने कामकाज चालल्यास पक्ष टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार यत्नाळ यांनी दिली.
राज्याच्या नवीन प्रभारींबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील प्रभारी अरुण सिंग यांनी केवळ विजयेंद्र यांची स्तुती केली आणि आपल्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले. विजापूरमध्ये महापौर आणि नगरसेवकांसह कार्यकर्त्यांची मोठी फळी असून, सर्वांना पक्षाबाहेर ठेवणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. काँग्रेसला मतदान केल्याची खोटी अफवा पसरवली जाऊ नये, यासाठी आपण स्वतः पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून भाजपलाच मतदान केल्याचे कळवले असल्याचे बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी स्पष्ट केले. आगामी काळात कोणी काँग्रेसला मतदान केले, हे सर्वांसमोर येईल, असेही त्यांनी नमूद केले.


Recent Comments