Vijayapura

पीआरसी प्रमाणपत्राविरोधात विजापुरात भाजपचे तीव्र आंदोलन

Share

कर्नाटक सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्राच्या प्रक्रियेविरोधात विजापुरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. हा निर्णय देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक असून यामध्ये राज्यपाल आणि केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

डॉ. बी. आर. आंबेडकर सर्कलसमोर एकत्र आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला लेखी निवेदन पाठवण्यात आले. काँग्रेस सरकार बेकायदेशीर स्थलांतरितांचे रक्षण करून आपली व्होट बँक तयार करण्यासाठी हा कट रचत असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष गुरुलिंगप्पा अंगडी यांनी केला.

पीआरसी लागू केल्यामुळे बेकायदेशीर रहिवाशांना अधिकृत मान्यता मिळेल आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे माजी मंत्री एस. के. बेळुब्बी यांनी म्हटले. भारतीय संविधान देशातील सर्व नागरिकांना एकच नागरिकत्व देते, त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय घटनाबाह्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हा बांगलादेशी आणि इतर बेकायदेशीर स्थलांतरितांना अधिकृत करण्याचा मोठा कट असून यामुळे स्थानिक नागरिकांच्या अन्न, पाणी आणि रेशन सुविधेवर गदा येईल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रशेखर कवटगी यांनी दिली. या आंदोलनात खासदार रमेश जिगजिणगी, माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेट्टी, विजूगौडा पाटील, संजय पाटील कनमडी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: