Belagavi

बेळगावमध्ये मोहन भागवत यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक सुरू

Share

कुंदनगरी बेळगावमध्ये आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) अत्यंत महत्त्वाची आणि प्रमुख अशी वार्षिक प्रांत प्रचारक बैठक सुरू झाली आहे. संघाच्या शताब्दी वर्षाची पूर्वतयारी आणि सद्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगावमधील अनगोळ येथील संत मीरा शाळेत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडत आहे. दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हे सत्र चालणार आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीला संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, भाजपचे संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यासह देशातील ११ क्षेत्रांतील ४६ प्रांत प्रतिनिधी आणि १३६ हून अधिक राष्ट्रीय प्रांत प्रचारक उपस्थित आहेत. या बैठकीत आरएसएसच्या शाखांचा विस्तार आणि शताब्दी वर्षाच्या नियोजनावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे.

या मोठ्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. सुरक्षेसाठी ३५० हून अधिक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे. सुरक्षेचे कारण लक्षात घेऊन माध्यम प्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांना बैठक परिसरात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

Tags: