बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील उमराणी गावात शेतातून आणलेली विषारी अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील गर्भवती महिलेसह नऊ जण तीव्र अस्वस्थ झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


उमराणी गावातील जिद्दीमणी आणि कोळी कुटुंबातील सदस्यांनी शेतातून आणलेल्या अळंबीचे घरात जेवण बनवून खाल्ले. मात्र, त्या अळंबीवर शेतमालकाने कीटकनाशक फवारले असल्याची माहिती नसल्याने जेवणानंतर सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ नऊही जणांना चिक्कोडी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु बाधितांपैकी एका गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


अळंबीवर औषध फवारणी केल्याचे आपल्याला माहीत नव्हते, अशी प्रतिक्रिया बाधित रुग्ण सत्यप्पा कोळी यांनी दिली. तर सर्व रुग्णांना वेळेत दाखल केल्यामुळे त्यांच्यावर योग्य उपचार करणे शक्य झाले असून सध्या सर्वजण धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्याधिकारी डॉ. बदनेयकाई यांनी दिली.

डी. के. उप्पार, चिक्कोडी.


Recent Comments