Belagavi

माजी सैनिकांच्या प्रलंबित समस्यांकडे वेधले राज्यपालांचे लक्ष

Share

बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन बेळगावमध्ये आयोजित होणाऱ्या २७ व्या कारगील विजयोत्सवाचे अधिकृत आमंत्रण दिले. या वेळी शिष्टमंडळाने माजी सैनिक आणि वीरनारींच्या प्रलंबित समस्यांचे निवेदन सादर करत विविध मागण्यांकडे राज्यपालांचे लक्ष वेधले.

या भेटीदरम्यान २६ जुलै रोजी होणाऱ्या कारगील विजयोत्सव कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची विनंती राज्यपालांना करण्यात आली. यासोबतच, राज्य सरकारच्या ‘डी’ ग्रुपच्या नोकऱ्यांमध्ये माजी सैनिकांसाठी असलेल्या १० टक्के आरक्षणाची योग्य अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. आरक्षण मिळूनही योग्य अंमलबजावणीअभावी अनेक माजी सैनिक बेरोजगार असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.

याशिवाय, गेल्या अनेक दशकांपासून माजी सैनिक आणि वीरनारींना मिळणारे जमिनीचे भूखंड अद्याप मिळालेले नाहीत, याकडे लक्ष वेधण्यात आले. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या पत्नींना शैक्षणिक पात्रतेनुसार राज्य शासनाने सरकारी नोकरी द्यावी, तसेच टोल नाक्यांवर माजी सैनिकांना सन्मानपूर्वक सवलत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील ३६ हजारांहून अधिक माजी सैनिकांच्या उपक्रमांसाठी ‘सैनिक भवन’ उभारण्याची अनेक वर्षांची मागणी अद्याप प्रलंबित असल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. या वेळी महाओव्हरऑल फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष जगदीश पूजेरी, रमेश चौगुला, शिवबसप्पा काडन्नवर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: