Belagavi

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बेळगावात जोरदार स्वागत

Share

मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर डी. के. शिवकुमार यांचे आज पहिल्यांदाच बेळगाव जिल्ह्यात आगमन झाले. सांबरा विमानतळावर जिल्हा प्रशासन आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले असून, राज्यातील पाऊस आणि पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. सांबरा विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यातील पाऊस आणि पिकांच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी सर्व विभागांचा दौरा केला जात आहे. याची सुरुवात बसवकल्याण येथून झाली असून बिदर आणि कलबुर्गी जिल्ह्यांचा दौरा करून आज बेळगावात आगमन झाले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकारच्या प्रमुख मंत्र्यांसह सर्व आमदारांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून सद्यस्थिती जाणून घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तत्पूर्वी, विमानतळावर मुख्यमंत्र्यांना बेळगाव शहर पोलिसांतर्फे मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) देण्यात आली. तसेच विमानतळाबाहेर जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी ‘डी. के. डी. के.’ अशा घोषणा देत त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी मंत्री सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार आसिफ सेठ, अशोक पट्टण, महेंद्र तमण्णावर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या स्वागतानंतर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार इतर नेत्यांसह बेळगाव शहराकडे रवाना झाले.

Tags: