विजापूर शहरात झालेल्या रस्ते अपघातात दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. नियंत्रण सुटलेल्या एका वेगवान लॉरीने दुचाकीसह इतर वाहनांना धडक दिल्याने हा अपघात घडला.


विजापूर शहरातील सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अनिल चहाच्या दुकानाजवळ असलेल्या भूतनाथ पेट्रोल पंपांसमोर बुधवारी हा अपघात झाला. एका भरधाव लॉरीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने आधी एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर बोलेरो, दुसरी एक लॉरी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक देत ही लॉरी रस्त्याशेजारील एका दुकानात घुसली. या अपघातात विजापूर येथील भूषण नायक आणि हासन येथील गगन परमेश या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या बिलाल जातगार यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हा अपघात इतका वेगवान होता की लॉरीच्या धडकेने वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर लॉरी चालक आपले वाहन घटनास्थळावरच सोडून पळून गेला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
चालकाचा वेग आणि निष्काळजीपणा दोन युवकांच्या जीवावर बेतला आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास असे अपघात घडू शकतात, हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.
विजयकुमार सारवाड
इन न्यूज
विजापूर


Recent Comments