M K HUBLI

एम. के. हुबळी येथील कल्मेश्वर हायस्कूलसमोरील रस्त्याची दुरवस्था

Share

बेळगाव जिल्ह्यातील एम. के. हुबळी येथील ऐतिहासिक कल्मेश्वर हायस्कूलसमोरील रस्त्याची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गाचे कारण पुढे करत स्थानिक नगरपंचायत प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पावसामुळे कल्मेश्वर हायस्कूलसमोरील रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून रस्त्यावर सांडपाणी आणि पावसाचे पाणी साचल्याने खड्डे पडले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना थेट रस्त्यावरून जाणे शक्य होत नसून, त्यांना शेजारील घरांच्या मागच्या बाजूने प्रवास करावा लागत आहे. शेजारीच नगरपंचायतीचे कार्यालय असतानाही विद्यार्थ्यांच्या या समस्येकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या समस्येबाबत स्थानिक नागरिक आणि शाळा प्रशासनाने नगरपंचायतीकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, हा भाग राष्ट्रीय महामार्ग (NH) प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असल्याने येथे गटार किंवा रस्ता दुरुस्ती करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत, असे उत्तर प्रशासनाकडून दिले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात तातडीने हस्तक्षेप करावा आणि रस्ता दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

Tags: