खानापूर तालुक्यातील कणकुंबी आणि जांबोटी भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे मलप्रभा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेत असलेल्या या भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.

या मुसळधार पावसामुळे जंगलांमधून छोटे-छोटे पाण्याचे प्रवाह आणि धबधबे वाहू लागले असून हे मनमोहक दृश्य पर्यटकांना आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे. कणकुंबीच्या दाट हिरव्यागार जंगलात सुरू असलेल्या या पावसामुळे संपूर्ण खानापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असलेल्या मलप्रभा नदीच्या उगमस्थानावर पावसाचा जोर वाढल्यामुळे नदी आता पूर्ण क्षमतेने वाहू लागली आहे. यामुळे मलप्रभा नदीकाठच्या लाखो शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी एक-दोन आठवडे असाच पाऊस सुरू राहिल्यास नवीलतीर्थ जलाशय पूर्णपणे भरण्यास मदत होईल असे मत स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.


Recent Comments