बेळगाव शहरातील फ्रुट मार्केटजवळील राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर पाईपलाईनच्या कामासाठी खोदण्यात आलेला रस्ता अद्याप नादुरुस्त असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.


फ्रुट मार्केटजवळील सर्व्हिस रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू झाल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक जास्त असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.


बेळगाव प्रवेशद्वारापासून ते संकम हॉटेल कॉर्नरपर्यंतचा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला आहे. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे येथे वाहने अडकून पडत आहेत. वंटमुरी क्रॉस ते गांधीनगर आणि फ्रुट मार्केटपर्यंतच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात दुर्घटना घडण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन येथे रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


Recent Comments