Belagavi

तोतया पत्रकारांच्या वसुलीच्या धंद्याला चाप

Share

बेळगाव जिल्ह्यात युट्युबर्स आणि सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्टच्या नावाखाली सुरू असलेल्या वसुलीच्या धंद्याला चाप लावण्यासाठी पोलीस विभागाने आता कडक कायदेशीर पाऊल उचलले असून अशा तोतया पत्रकारांना पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस अधीक्षकांनी ब्लॅकमेल करून पैसे उकळणाऱ्या भामट्यांवर थेट गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा दिला. शेतकऱ्यांपासून ते शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच धमकावून पैसे उकळणाऱ्यांची गय केली जाणार नाही. बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या अशा बनावट पत्रकारांवर कडक गुन्हे दाखल करून, येत्या दिवसांत त्यांची नावे गुंडांच्या यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.

“युट्युबर्स किंवा सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्टच्या नावाखाली जर कोणी वैयक्तिक बदनामीची भीती दाखवून पैशांची मागणी करत असेल, तर नागरिक आणि अधिकाऱ्यांनी न घाबरता पोलिसाकडे तक्रार करावी. अशा प्रकरणांत पोलीस तात्काळ कारवाई करून आरोपींना गजाआड करतील. तसेच यापुढे केवळ अधिकृत आणि नोंदणीकृत प्रसारमाध्यमांनाच पोलिसांच्या पत्रकार परिषदेत प्रवेश दिला जाईल,” असे बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी म्हटले.

पोलीस प्रशासनाच्या या कडक भूमिकेमुळे सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या तोतया युट्युबर्सचे धाबे दणाणले आहेत.

Tags: