Belagavi

राष्ट्रीय पातळीवरील ‘मसल मेनिया’ बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप

Share

बेंगळुरू येथे पार पडलेल्या मानाच्या राष्ट्रीय पातळीवरील ‘मसल मेनिया बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप’मध्ये बेळगावच्या केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजचा विद्यार्थी ओम विजय पाटील याने विजेतेपद पटकावून सीमाभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

देशातील विविध राज्यांतील मातब्बर स्पर्धकांना मागे टाकत जीआयटीच्या विद्यार्थ्याने राष्ट्रीय क्रीडा मंचावर ही अपूर्व कामगिरी केली आहे. बेळगावच्या केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जीआयटी) कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचा सहाव्या सेमिस्टरचा विद्यार्थी ओम विजय पाटील याने बेंगळुरू येथील खिंचा सभागृहात आयोजित राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित ‘मसल मेनिया बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप’मध्ये ‘विजेतेपद’ (Winner Title) मिळवून संस्थेचे नाव उंचावले आहे.

देशभरातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आघाडीच्या शरीरसौष्ठवपटूंनी या चुरशीच्या स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये ओम पाटीलने उत्कृष्ट शरीरसौष्ठव, कठीण सराव आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर हा सर्वोच्च बहुमान मिळवला. विद्यार्थ्याच्या या उत्कृष्ट राष्ट्रीय कामगिरीचे कौतुक करत जीआयटी व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र बेळगावकर, सदस्य राम भंडारे, यु. एन. कालकुंद्रीकर आणि आर. एस. मुतालिक यांनी संस्थेच्या वतीने आनंद व्यक्त केला आहे.

यासोबतच कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय आठवले, डीन ॲडमिनिस्ट्रेशन प्रा. दिगंबर कुलकर्णी, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. जॉर्ज रॉड्रिक्स आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या सदस्या सुभास्व शिखरे, शिवानी कराळे व निकिता पाटील यांनी ओम पाटील याच्या शिस्तीचे आणि कठोर परिश्रमाचे भरभरून कौतुक केले असून, जीआयटी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्याच्या पुढील क्रीडा प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: