बेळगाव ग्रामीण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे माजी ग्रामीण अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, यासाठी त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय जाधव यांनी आरोप केला की, मतदार यादीत नवीन नावे जोडताना बूथ पातळीवरील अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलेले नाही. त्यांनी घरातच बसून माहितीची कॉपी-पेस्ट केल्यामुळे विवाह करून आलेल्या महिलांच्या वडिलांच्या जागी पतीच्या वडिलांचे नाव नोंदवले गेले आहे. यामुळे पती-पत्नी भाऊ-बहीण असल्यासारखा गंभीर गोंधळ निर्माण झाला आहे.

बेळगाव उत्तर मतदारसंघात एका विशिष्ट धार्मिक संस्थेच्या कार्यालयात बसून बूथ पातळीवरील अधिकाऱ्यांकडून ओटीपी घेतला जात असून ॲप्सद्वारे मतदारांची नावे अपलोड केली जात आहेत, असा दावा त्यांनी केला. निवडणूक प्रक्रियेतून पूर्वी वगळलेली नावे बेकायदेशीरपणे पुन्हा समाविष्ट करण्याचा हा मोठा घोटाळा असून, केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाकडे याविरोधात तक्रार नोंदवली आहे. उच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदार यादीचे पुन्हा मॅपिंग करावे, अशी मागणी त्यांनी केली. या प्रसंगी भाजप ग्रामीणचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments