Uncategorized

आमदारांच्या कार्यालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्न

Share

धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद शहरात मालमत्ता विक्रीच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला गेल्याने, एका व्यक्तीने आमदारांच्या कार्यालयासमोरच स्वतःच्या पोटात चाकू खुपसून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवलगुंद तालुक्यातील पडेसूर गावचा रहिवासी महांतेश तुरुमुरी याने अलीकडेच आपली मालमत्ता विकली होती. याच मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या विषयावरून आज नवलगुंद तालुका पंचायत आवारात असलेल्या आमदार एन. एच. कोनरड्डी यांच्या कार्यालयासमोर खरेदीदारांसोबत चर्चा सुरू होती. यावेळी दोन्ही बाजूंनी वाद वाढल्याने मनस्ताप झालेल्या महांतेशने सर्वांच्या देखत अचानक स्वतःजवळील चाकूने आपल्या पोटात वार करून घेतले.

ही घटना घडताच घटनास्थळी हजर असलेल्या नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महांतेशला नवलगुंद तालुका रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार दिले. मात्र, जखम गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नवलगुंद पोलिसांनी त्याला हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलवले आहे. नवलगुंद पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Tags: