Belagavi

बेळगावात ‘सहकार सप्ताह’ निमित्त श्री बसवेश्वर बँकेतर्फे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम

Share

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सहकार सप्ताह’ अंतर्गत कर्नाटक सहकार विभाग, कर्नाटक राज्य सहकार महामंडळ (बेंगळुरू) आणि बेळगाव जिल्हा सहकार युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावच्या श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या वतीने फुलबाग गल्ली येथील सरकारी कन्नड मुलांची शाळा नंबर ७ मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

या कार्यक्रमाला सहकार विभागाच्या सहकार निबंधक कार्यालयातील सहाय्यक अधिकारी सरोजा परेट या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी बँकेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. या प्रसंगी बोलताना बँकेचे अध्यक्ष रमेश कळसण्णावर यांनी मानवी जीवनात झाडांचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. झाडे ही मानवाची जीवनवाहिनी असून हरित पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि भावी पिढीच्या कल्याणासाठी प्रत्येकाने मोठ्या संख्येने झाडे लावून त्यांचे जतन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला बँकेचे संचालक बी. ए. उप्पीन, एस. एस. हिरेकर, एस. के. पाटील, बी. पी. बागी, पी. ए. हुक्केरी, एन. डी. झोंड, आर. बी. काळेनट्टी, जी. एस. खडबडी तसेच व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आर. एस. चोण्णद आणि एम. एम. उडदार उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Tags: