Belagavi

मुतगे येथील ३०० वर्षे जुन्या ऐतिहासिक विहिरीचे पुनरुज्जीवन; जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडून विहिरीची पाहणी

Share

बेळगाव जिल्ह्यातील मुतगे गावातील तब्बल ३०० वर्षे जुनी, स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक विहीर पुनरुज्जीवित करण्यात आली असून, या उल्लेखनीय उपक्रमाची पाहणी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली. वारसा संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या या उपक्रमामुळे बेळगावच्या समृद्ध ऐतिहासिक वारशातील एका महत्त्वाच्या घटकाला नवजीवन मिळाले आहे.प्यास फाउंडेशन, डॉ. माधव प्रभू आणि स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून या ऐतिहासिक विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. अनेक वर्षे दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या या विहिरीची स्वच्छता, दुरुस्ती आणि संवर्धन करून तिला पुन्हा पूर्ववैभव प्राप्त करून देण्यात आले आहे. या कार्यामुळे केवळ जलस्रोताचे पुनरुज्जीवन झाले नसून, ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दिशेनेही एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

पुनरुज्जीवित विहिरीची पाहणी करताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. बेळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसास्थळांचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारके, प्राचीन वास्तू आणि वारसास्थळांचे टप्प्याटप्प्याने पुनरुज्जीवन व्हावे, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.बेळगावला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य वारसा लाभला आहे. या वारशाचे जतन करण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास अनेक ऐतिहासिक वास्तूंना नवसंजीवनी मिळू शकते, असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाप्यास फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे मुतगे गावातील ३०० वर्षे जुन्या विहिरीला पुन्हा जीवनदान मिळाले असून, हा उपक्रम भविष्यात बेळगाव जिल्ह्यातील इतर वारसास्थळांच्या संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. यावेळींमुतगे गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते उमेश पुरी,कृष्णा पाटील, सुरज पाटील, परशराम केदार,लक्ष्मण रामजी,महावीर गुडाज,दिपक पुरी, कुणाल पाटील,उपस्थित होते

Tags: