Belagavi

घुमटमाळ मारुती मंदिर आणि बांडगी ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

Share

बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यम शाळांमध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा श्री घुमटमाळ मारुती मंदिर पब्लिक ट्रस्ट आणि कै. बी. के. बांडगी शैक्षणिक ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला.

घुमटमाळ मारुती मंदिरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष कुलदीप भेकणे होते. यावेळी व्यासपीठावर रघुनाथ बांडगी, प्रकाश माहेश्वरी आणि अनंत लाड उपस्थित होते. तालुक्यातील विभिन्न शाळांमधील २५ हून अधिक गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी १,५०० रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तके देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मनस्वी बांडगी यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर रघुनाथ बांडगी आणि प्रकाश कडोळकर यांनी दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमात किशोर काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर मुख्य वक्त्या प्रा. स्वरूपा इनामदार यांनी विद्यार्थिनींना कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि नम्रतेने जीवन उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.

या सोहळ्याला बाबुराव पाटील, चंद्रकांत बांडगी, संभाजी चव्हाण, सुनील सरनोबत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अनंत लाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर नेताजी जाधव यांनी आभार मानले.

Tags: