बेळगाव तालुक्यातील हलगा गावात हिंदू-मुस्लिम सलोख्याचे प्रतीक आणि ‘विविधतेत एकता’ या मूल्याची साक्ष देणारा मोहरंम सण अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

इस्लामी कालखंडातील त्याग आणि बलिदानाचे स्मरण करून देणारा हा मोहरंम सण हलगा गावात केवळ एका समाजापुरता मर्यादित न राहता संपूर्ण गावचा उत्सव बनला आहे. येथील हजरत बीबी फातिमा दर्ग्यामध्ये अनेक पिढ्यांपासून ही परंपरा जोपासली जात आहे.

या सणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील ताबूताची मिरवणूक गावातील हिंदू मंदिरांनाही आवर्जून भेट देते. दर्ग्यातील धार्मिक विधी मुल्ला परिवार पार पाडतो, तर मुख्य सेवेचा मान बेलगोजी कुटुंबाकडे आहे. हा अनोखा समन्वय येथील सामाजिक सलोख्याची प्रचिती देतो.

मिरवणुकीदरम्यान सादर होणारे मज्नू नृत्य आणि अग्निकुंडावर चालण्याची परंपरा भाविकांचे लक्ष वेधून घेते. गावातील महिला आणि सुवासिनी अत्यंत श्रद्धेने या सर्व विधींमध्ये आणि नवस फेडण्याच्या परंपरेत सहभागी होतात.

आजच्या आधुनिक काळातही जाती-पातीच्या भिंती तोडून सलोख्याने साजरा होणारा हलगा गावचा हा मोहरंम सण देशासाठी एक आदर्श ठरला आहे.


Recent Comments