Belagavi

भ्रष्टाचार तपासासाठी लोकायुक्त असताना ‘ईडी’ची कारवाई का; मंत्री सतीश जारकीहोळी यांचा सवाल

Share

आपल्या एका नातेवाईकाच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या छाप्यांबाबत तपास पूर्ण होईपर्यंत सध्यातरी काहीही बोलता येणार नाही, असे राज्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सतीश जारकीहोळी बोलत होते. संबंधित व्यक्तीवरील ईडी कारवाईबाबत कोणालाही प्रमाणपत्र देण्याची गरज नाही, तसेच ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे का, या प्रश्नावर त्यांनी सध्यातरी यावर भाष्य करणे टाळले.

राज्यात भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करण्यासाठी लोकायुक्त आणि इतर यंत्रणा कार्यरत असताना, थेट ‘ईडी’ने या थराची कारवाई करणे आश्चर्यकारक असल्याचे जारकीहोळी यांनी नमूद केले. राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषयात केंद्र सरकारने तपास सुरू केल्याने संभ्रम वाढला असून, अंतिम अहवाल येईपर्यंत काहीही सांगता येणार नाही, असे ते म्हणाले. आपत्ती व्यवस्थापन आणि दुष्काळी परिस्थितीच्या नियोजनासाठी तीन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली असून, बेळगाव शहराच्या पाणी समस्येबाबत उद्याच एक महत्त्वाची बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला उत्तर-पश्चिम कर्नाटक रस्ते वाहतूक संस्थेचे (NWKRTC) उपाध्यक्ष संजीव हणुमन्नवर आणि जिल्हा हमी योजना समितीचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: