कन्नड चळवळीतील नेते वाटाळ नागराज यांनी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीवर आणि शिवसेनेवर १५ जुलैपर्यंत बंदी न घातल्यास तीव्र आंदोलनाची वल्गना करत पुन्हा बेळगावच्या कायदा सुव्यवस्थेला वेठीला धरण्याचा डाव आखला आहे.

सीमाभागात नेहमीच मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱ्या नागराज यांनी आता पुन्हा एकदा कन्नड भाषा धोक्यात आल्याचा जुनाच राग आळवत मराठी भाषिकांना पुन्हा ‘लक्ष्य’ करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.

बेळगाव, सोलापूर आणि अक्कलकोट या भागांवर कर्नाटकचा दावा सांगत वाटाळ नागराज यांनी तिथे मराठीचे वर्चस्व संपवण्याची भाषा केली आहे. बेळगाव हा कर्नाटकचा भाग असताना तिथे महाराष्ट्र एकीकरण समितीची गरज काय, असे तारे तोडत सीमाभागातील मराठी जनतेच्या कायदेशीर हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला. गृहमंत्र्यांनी तातडीने म. ए. समितीवर बंदी आणून मराठी नेत्यांना हद्दपार करावे, अशी कोल्हेकुई करत आपल्या नेहमीच्या आक्रस्ताळी शैलीचे प्रदर्शन घडवले.
बेळगाव महानगरपालिकेत ‘बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग’ असल्याचा ठराव मंजूर व्हावा यासाठी कन्नड संघटनांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला शंभर दिवस उलटूनही सरकारने अजिबात दाद दिलेली नाही. महाराष्ट्रात शिवसेना आणि इतर मराठी नेत्यांशी उत्तम संबंध ठेवणारे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे म. ए. समितीवर कधीही बंदी घालणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यामुळे हताश झालेल्या वाटाळ नागराज यांनी आता १५ जुलै रोजी १ हजार वाहनांसह बेळगावात येऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची आणि ठरावावरून पुन्हा वातावरण बिघडवण्याची केवळ वल्गना केली आहे.


Recent Comments