बेळगाव महानगरपालिकेत जबरदस्तीने कन्नड धोरणाचा ठराव मंजूर करून घेण्यासाठी विविध कन्नड संघटनांनी सुरू केलेल्या उचापतींना आता शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने आंदोलनकर्त्यांनी चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरात १०१ नारळ फोडून नेहमीप्रमाणे स्टंटबाजी केली.


बेळगाव शहरात मराठी भाषिकांवर विनाकारण दबाव आणण्यासाठी आणि शहरात अशांतता पसरवण्यासाठीच हा सर्व खटाटोप सुरू असल्याची भावना बेळगावकरांकडून व्यक्त होत आहे. कन्नड संघटनांचा हा उच्छाद आता हद्द पार करत असून त्यांचे वागणे शिशुपालसारखे झाले आहे, ज्याच्या चुकांचा घडा आता भरत आला आहे, अशी टीका मराठी भाषिक जनतेतून होत आहे.


पालिका प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना आपल्या दबावाखाली आणण्यासाठी आंदोलकांनी मंदिरासमोर नारळ फोडून जोरदार घोषणाबाजी केली. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्न प्रलंबित असतानाही, पालिकेच्या अंतर्गत कामकाजात हुकूमशाही पद्धतीने स्वतःचे अजेंडे राबवण्यासाठीच या कुरापती काढल्या जात आहेत.
या वेळी बोलताना कन्नड नेते अशोक चंदरगी यांनी बेळगावचे महापौर आणि उपमहापौरांवर जाहीर नाराजी व्यक्त केली. पालिकेत सत्ता असूनही लोकप्रतिनिधी कन्नड ठराव घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, राज्य सरकारने यात थेट हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत त्यांनी मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाची पोकळ धमकी दिली. केवळ राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि मराठी भाषिकांच्या भावना दुखावण्यासाठी हे नेते अशी विधाने करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या तथाकथित आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेल्या कुरापतींमध्ये वाजीद हिरेकोडी, बलराम मासेनट्टी, श्रीनिवास ताळूकर यांच्यासह इतर कन्नड कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments