बेळगाव येथील हिंडलगा फॅक्टरीतील एका तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी माजी महापौर बसप्पा चिक्कलदिन्नी यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात वाहनांचे नुकसान झाले असून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी माजी महापौरांनी केली आहे.


हिंडलगा फॅक्टरीमध्ये कार्यरत असलेल्या एका तरुणाने बुधवारी नोकरी कायम होत नसल्याच्या कारणावरून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने रामाचारी नामक व्यक्तीला नोकरीसाठी ५ लाख रुपये दिल्याचे आणि कंत्राटदार केवळ जवळच्या नातेवाईकांना प्राधान्य देत असल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर मुत्यानट्टी गावातील नागरिकांनी माजी महापौर बसप्पा चिक्कलदिन्नी यांच्या घरावर आणि कार्यालयावर दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली.


या घटनेनंतर माजी महापौर बसप्पा चिक्कलदिन्नी यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले की कंपनीत नोकरभरती करताना स्थानिक तरुणांनाच प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच मृत तरुणाकडून ५ लाख रुपये घेणाऱ्या रामाचारी नामक व्यक्तीशी आपला किंवा संस्थेचा कोणताही संबंध नाही. वैयक्तिक आणि राजकीय द्वेषातून हा हल्ला घडवून आणण्यात आला असून लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या व्यक्तीलाच सुरक्षा न मिळाल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सध्या काकती पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



Recent Comments